सांधे दुखी भाग-२

    Date : 25-Jun-2020
|


Arthritis and ayurved_1&n                             

 

 
 सांधे दुखी भाग-२

                                                                                                                                             वैद्य विजय कुलकर्णी, नाशिक

                                                       मो-९८२२०७५०२१

चिकित्सेपूर्वी निदान महत्वाचे:-

         कोणत्याही रोगाची चिकित्सा जाणून घेण्यापूर्वी त्या रोगाचे नीट निदान होणे आवश्यक ठरते. संधीवात आणि आमवात या दोन्ही रोगांमध्ये चिकित्सा भिन्न असते.त्यामुळे सांधेदुखी या दोनपैकी कशामुळे आहे हे जाणून घ्यावे लागते. आणि त्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक ठरतो.वैद्य आपल्या अनुभवाने हा भेद जाणून त्यावर योग्य ती चिकित्सा करतात.

        संधीवाताचा उपचार करतांना वात दोषांचा विचार सर्वप्रथम करावा लागतो.या वातावर ‘ तेल ‘ हे उत्तम औषध आहे असे आयुर्वेदाने सांगितले आहे.तेल हे वातदोषावरील ( म्हणजेच वातदोषामुळे शरीरात होणाऱ्या विविध विकृतीवरील) परमं म्हणजेच श्रेष्ठ औषध आहे असे ‘ वाग्भट ‘ या विद्वान आयुर्वेदीय ग्रंथकाराने सांगितले आहे. ( आपण खूप थकल्यामुळे आपले पाय दुखत असतील तर पायांना तेलाने मालिश केल्यास पाय दुखणे थांबते असा आपणापैकी अनेकांचा अनुभव असेल.) तेव्हा संधिवातावरील सांधेदुखीवर बाहेरून तेल लावणे हा एक प्रमुख उपचार होय.यासाठी तिळाचे तेल अतिशय उपयुक्त ठरते.त्याचप्रमाणे तीळ तेलाचा बेस म्हणून उपयोग करून नारायण तेल,महानारायण तेल, वातनाशक तेल, अभ्यंग तेल, अश्वगंधादि तेल, निर्गुडी तेल,अशा विविध तेलाचा उपयोग वेगवेगळ्या अवस्थांनुसार वैद्यकीय सल्ल्याने करता येतो.

 ‘ आमवात ‘ या व्याधीमध्ये ( ज्यामध्ये सांध्याच्या ठिकाणी सूज असते, गरमपणा असतो, विंचू चावाल्यासारख्या वेदना असतात, थोडा ताप असतो, सांधे जखडून जातात) मात्र अशा तेलांचा उपयोग होत नाही,उलट त्रास वाढून वेदना वाढण्याची शक्यता असते. म्हणून सांधेदुखी ही संधीवातामुळे आहे की आमवतामुळे आहे हे समजणे महत्वाचे आहे. म्हणूनच सांधेदुखी सुरु झाली की तेल लावा असा सर्वसाधारण समज आढळतो, तो तितकासा बरोबर नाही हे वरच्या वर्णनावरून लक्षात आले असेलच

   सांधेदुखीवर दुसरा महत्वाचा उपचार म्हणजे ‘ शेक ‘ घेणे हा होय.यालाच स्वेदन असे म्हणतात.या स्वेदनामुळे म्हणजे शेकामुळे सांधेदुखीवर बराच आराम पडतो. हा शेक घेण्यासाठी गरम पाण्याची पिशवी,

गरम कपडा, गरम पाणी, गरम वाळूची पुरचुंडी, विटेचा गरम केलेला तुकडा अशी विविध साधने वापरता येतात. संधिवातात आणि आमवातात वापरल्या जाणाऱ्या साधनांमध्ये फरक असतो. संधीवातात घ्यावयाचा शेक हा स्निग्ध शेक असतो. म्हणजे यामध्ये सांध्याच्या ठिकाणी तेल लावून त्यावर गरम पाणी ओतणे, गरम पाण्याच्या पिशवीने किवा गरम कपडयाने शेकणे हे अभिप्रेत असते. आमवातात मात्र रुक्ष शेक अपेक्षित असतो. म्हणजे यामध्ये तेल न लावता शेक घ्यावा लागतो. शेकण्यासाठी वाळू गरम करून तिची पुरुचुंडी करून त्याचा शेक घ्यावा लागतो.किंवा विटेचा तुकडा गरम करून त्याचा शेक घ्यावा लागतो. बाहेरून तेल लावणे किंवा न लावणे, तसेच शेक घेणे हे सांधेदुखीवर बाहयोपचार झाले.सांधेदुखीवर शरीरांतर्गतही काही उपचार करणे आवश्यक ठरते.यामध्ये ‘ पंचकर्म ‘ या वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेदीय चिकित्सेचा खूप उपयोग होतो. या पंचकर्मांपैकी ‘ बस्ती ‘ हा उपक्रम या सांधेदुखीवर फायदेशीर ठरतो. या उपक्रमामध्ये गुदद्वारावाटे काही औषधी तेल किंवा काढे आतल्या आतड्यापर्यंत पोहोचवले जातात. वातदोषांच्या नियांणासाठी याचा अप्रतिम उपयोग होतो असे आढळते.प्रत्यक्षातही अनेक वैद्य या बस्तीचा अवलंब करतात. शरीराच्या कोणत्याही भागात मधूनमधून होणाऱ्या वेदना या बस्तीचिकित्सेमुळे कमी होतात.

    बस्तीप्रमाणेच ‘ सौम्य वेरचन ‘ हे देखील बऱ्याचदा वातदोषामुळे होणाऱ्या व्याधिंवर उपयुक्त ठरते. बस्ती, विरेचन हे चिकित्सा उपक्रम अर्थातच वैद्यकीय मार्गदर्शनाखालीच करून घ्यावे.

पोटात घ्यावयाची औषधे-:

     सांधेदुखीवर पोटामध्ये काही आयुर्वेदीय औषधांची अंमलबजावणी केल्यास त्याचाही फायदा दिसतो.’गुग्गुळ’ हा पदार्थ या संदर्भात अतिशय औषधी आहे सांधेदुखी म्ह्टली की गुग्गुळाच्या गोळया घ्या असे बरेच जण दुसऱ्यांना सांगत असतात. गुग्गुळ म्हणजे एका वनस्पतीचा निर्यास असून या गुग्गुळाची शुद्धी करून मगच तो औषधांमध्ये वापरावा लागतो. या गुग्गुळामध्ये इतर वेगवेगळी औषधी द्रव्ये घालून त्यांची अनेकविध मिश्रणे बनवली जातात. या प्रत्येक मिश्रणाला वेगवेगळी नावे आहेत. योगराज गुग्गुळ, कैशोर गुग्गुळ, सिंहनाद गुग्गुळ, त्रिफळा गुग्गुळ, इ.या प्रत्येक गुग्गुळाचा उपयोग सांधेदुखीच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये नीट विचारपूर्वक करावा लागतो. (अर्थातच वैद्याच्या सल्ल्याने.)