सुंठीचे औषधी उपयोग

    Date : 29-Jun-2020
|

सुंठीचे औषधी उपयोग 

                                               वैद्य विजय कुलकर्णी

                                                     आयुर्वेद चिकीत्सक नाशिक

                                                     मो ९८२२०७५०२१

        सुंठीवाचून खोकला गेला हि म्हण आपल्या सर्वांना परिचित आहे.या म्हणीचा अर्थ थोडा वेगळा असला तरीदेखील त्यामध्ये सुंठीचा खोकला घालवण्याचा गुणधर्म पूर्वीपासून आपल्या लोकांना माहिती होता.हे सिध्द होते. अर्थात आयुर्वेदाचे प्राचीन ग्रंथ पाहिले तर त्याबद्दल सुंठीची आपल्या आरोग्यासाठी असलेली महती लक्षात येते.

         आल्यापासून थोडी प्रक्रिया करून सुंठ तयार करतात.आपल्या शरीरासाठी हि सुंठ अत्यंत उपयुक्त आहे.उष्ण गुणाची असलेली सुंठ शरीरातील कफ दोष प्रामुख्याने कमी करते.सुंठीचा काढा योग्य प्रमाणात जेष्ठ मधाबरोबर योग्य वैद्यकीय सल्ल्याने वापरल्यास कफाचे अनेक रोग आटोक्यात येतात. सुंठीचे चूर्ण आणि जेष्ठमध यांचे मिश्रण मधातून घेतल्यास सर्दी पडसे ,खोकला ,दमा ,यावर चांगला उपयोग होतो. सुंठ हि आपली भूक वाढवण्यास मदत करते.त्याच बरोबर जुलाबा सारख्या विकारात सुंठ गुळ आणि दुधावरची साय यांची गोळी करून वापरल्यास ती उपयोगी ठरते.सुंठ आणि साखर हे मिश्रण पित्तामुळे होणारी डोकेदुखी त्यामुळे येणारी चक्कर यावर उपयोगी पडते. उष्ण गुणाची असल्याने सुन्ठीमुळे पित्ताचे स्त्राव आपल्यापोटात योग्य प्रमाणात होऊन आपली पचन शक्ती सुधारते.हिवाळा संपून पूर्ण उन्हाळा सुरु होण्यापूर्वी मधल्या ऋतू संधीच्या काळामध्ये सुंठ भिजत घालून त्याचे पाणी प्यायल्यास कफदोष वाढत नाही.आणि ऋतू काळानुसार निर्माण होणारा तापही टळू शकतो.सुंठ हि दुध ,चहा ,ताक यामधूनही घेता येते. सुंठ हि पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हि चांगली वापरता येते.ऐन उन्हाळ्यात सुंठीचा उपयोग टाळणे चांगले असते.पित्त प्रकृती असणार्या व्यक्तींनी सुंठ जपून खावी. सुंठ उष्ण आहे म्हणून कफाच्या विकारातही तिचे घेण्याचे प्रमाण आणि पद्धत योग्य वैद्यकीय सल्ल्याने ठरवावे लागते.

          सुंठीचा जसा पोटातून घेण्यास उपयोग होतो. तसाच तो बाहेरूनही होतो. कफाचे प्रमाण जास्त वाढून सर्दी आणि खोकला झाल्यास कपाळावर आणि छातीवर सुंठ आणि वेखंड यांचा गरम पाण्यातून लेप देतात. सर्दीची डोकेदुखी याने थांबते. तीव्र सर्दीवर सुंठीचे चूर्ण प्रधमन नस्यासाठी वापरतात.अर्थात हे हि वैद्यकीय मार्गदर्शनाखाली करावे लागते. आयुर्वेदीय ग्रंथकारांनी तिला विश्वभेषजा असे सार्थ नाव दिले आहे. सुंठीप्रमाणेच आल्याचेही औषधी गुणधर्म आहेत.