जांभूळ पिकल्या झाडाखाली

    Date : 29-Jul-2020
|


जांभूळ_1  H x W 

निसर्गातील औषधे भाग-३६

                             मधुमेहावर विशेष उपयोगी जांभूळ-(बी)

                                                             वैद्य विजय कुलकर्णी,नाशिक

                                                              मो-९८२२०७५०२१

जांभूळ हे फळ आपल्या सर्वांच्या परिचयाचे आणि बहुतेकांच्या आवडीचेही आहे.हल्ली मधुमेही रुग्णांचे प्रमाण वाढलेले असल्याने हे फळ अधिक चर्चेमध्ये आलेले आहे.पण मधुमेहासाठी आयुर्वेदात जांबूळाचे बी विशेष उपयोगी आहे. हे मात्र अनेकांना माहिती नाही.त्यामुळे अनेक मधुमेही आपल्या रक्तातील साखर कमी व्हावी म्हणून फक्त जांभूळ खातांना दिसतात.हे योग्य नव्हे यासाठी जांबळातील औषधी गुणांची आपण नीट माहिती करुन घेतली पाहिजे.

    झाडाचे स्वरूप-जांभूळाचा वृक्ष हा हिरव्या पानांनी बहरलेला बऱ्याच मोठ्या उंचीचा असतो. उन्हाळाच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरवातीला त्याला फळे येतात. आयुर्वेदीय ग्रंथकारांनी याला जंबू या संस्कृत  नावाने संबोधिले आहे. याचे राजजंबू आणि क्षुद्र जंबू असे विविध प्रकार आहे. भारतात हे झाड सर्वत्र दिसते.

औषधीगुण- जांभूळ हे पचायला हलके गुणाने कोरडे आणि थंड असते.चवीला अतिशय तुरट थोडे आंबट आणि काहीसे गोड देखील असते.शरीरातील तीन दोषांपैकी कफ आणि पित्त या दोन दोषांचे शमन करते. त्यामुळे कफ आणि पित्त या दोषांमुळे होणाऱ्या अनेक रोगांवर ते उपयुक्त ठरते.मात्र ते वातदोषांला वाढविणारे असल्याने वात विकार झालेल्या रुग्णांनी त्याचे सेवन सावधपणे केले पाहिजे.

बाह्य उपयोग- जांभूळ हे तुरट चवीचे असल्याने त्याच्या झाडाची साल बारीक चूर्ण करुन जखमेतून होणाऱ्या रक्तस्त्राव थांबविते.विविध त्वचेच्या विकारात त्वचेची होणारी आग कमी करण्यासाठी यांच्या फळातील मगज तीळ तेलात शिजवून थंड झाल्यावर लावतात.तापातील शरीरातील वाढलेले तापमान कमी करण्यसाठी देखील यांचा उपयोग कपाळावर लावण्यासाठी करतात.

 पोटातून उपयोग- जांभूळाची साल,पाने,फळ आणि बी या सर्वांचा औषधी उपयोग जांभूळ पोटातून घेतल्यासही होतो. जांबळाच्या झाडाची साल विविध प्रकारच्या रक्तस्त्रावावर योग्य वैद्यकीय सल्ल्यानुसार पोटातून घेता येते.जांबळाचे फळ हे आपली भूक आणि पचनशक्ती वाढविणारे तसेच यकृताचे कार्य सुधारणारे असते.

अजिर्णामुळे होणाऱ्या उलटीवर जांबळाच्या पानांचा रस उपयोगी पडतो. जांबळाचे फळ तुरट असल्याने जुलाब,आव पडणे यावर उपयोगी पडते परंतु जांबळे जास्त प्रमाणात खाल्यास मलावरोधाचा त्रास होऊ शकतो हे लक्षात घेतले पाहिजे.

मधुमेहासाठी जांभूळ बी- मधुमेहावर जांबळाच्या बीचे चूर्ण योग्य वैद्याच्या सल्ल्यानुसार घेतल्यास उपयोगी पडते याचा अर्थ केवळ जांबळाचे बी घेऊन चालत नाही त्याच्याबरोबर रुग्णांच्या अवस्थेनुसार,प्रकुर्तीनुसार इतरही काही औषधांचा उपयोग करावा लागतो. आणि योग्य व्यायाम आहारातील पथ्यापथ्य यांचाही अवलंब करावा लागतो. अनेकवेळा मधुमेही रुग्ण जांभूळबी,मेथीबी,कारल्याचारस,गुडमार अशा काही वनस्पतींचे मिश्रण करुन खात असतात.परंतु मधुमेहाच्या कोणत्या अवस्थेत कोणती औषधे मिश्र करुन किती प्रमाणात किती कालावधीसाठी घ्यावीत हे वैद्यकीय सल्ल्यानेच ठरवावे लागते. हे मधुमेही रुग्णांनी नीट ध्यानात ठेवले पाहिजे. जांबळापासून जम्ब्वासव,जम्ब्वाद्य तेल,पंचपल्लव योग,अशी विविध आयुर्वेदीय औषधे तयार करुन वापरली जातात.अशा प्रकारे जांभूळ हे निसर्गातील एक उत्तम औषध आहे.