बहुगुणी आवळा

    Date : 16-Sep-2020
|

बहुगुणी आवळा


body and mind_1 &nbs 

वैद्य विजय कुलकर्णी,नाशिक

मो-९८२२०७५०२१

आरोग्य चिंतन या मासिकाचे अवश्य वर्गणीदार व्हा .
वार्षिक वर्गणी रुपये दोनशे पन्नास फक्त! ई-मासिक
तसेच प्रिंट कॉपी या दोन्ही स्वरूपात उपलब्ध. वर्गणी
भरण्यासाठी www.arogyachintan.in वेबसाईटवर
सोय उपलब्ध आहे किंवा संपर्क 9822075021 

आपल्या सर्वांना परिचित असणारे आवळा हे एक उपयुक्त फळ आहे.भारतात सर्वत्र होणारा हा आवळा लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना प्रियही आहे.साधारणपणे ऑक्टोंबरपासून जानेवारी,फेब्रुवारीपर्यंत ४-५ महिने आवळ्याचे फळ पहावयास मिळते.याच काळात त्यापासून विविध प्रकारची औषधे बनवून वापरली जातात.आयुर्वेद शास्त्राने या आवळ्यामध्ये असणाऱ्या अनेक औषधी गुणधर्माचे वर्णन केले आहे.त्याची माहिती सर्वांनाच उपयुक्त ठरेल असे वाटते.

आयुर्वेदातील वर्णन

आमलकी ,धात्री ,वयस्था अशा विविध पर्यायी नावांनी हा ओळखला जातो.यापासून विविध प्रकारची आयुर्वेदीय औषधे तयार केली जातात.

‘आवळा’ हा गुणधर्माने थंड आहे. ‘खारट’ चव सोडून इतर पाचही चवी आवळ्यामध्ये आहेत.त्यामध्ये आंबट चव विशेषत्त्वाने आहे.पण आवळा ‘मधुर’ देखील आहे.आवळा खाऊन वर थोडे साधे पाणी प्यायल्यावर त्याच्या गोड चवीची कल्पना येते. आवळा थंड असल्यामुळे पित्तदोष कमी करणारा आहे.अंगातील उष्णता कमी करणारा आहे.रक्तपित्तावर आवळा अतिशय उपयुक्त आहे.

आवळ्यापासून ‘मोरावळा’ नावाचे एक टिकाऊ औषध तयार करतात.अनेक कुटुंबामध्ये आवळ्याच्या दिवसात ताजे आवळे आणून साखरेच्या पाकामधे ते मुरून ठेवण्याची परंपरा असते.हा मुरवून ठेवलेला आवळा म्हणजेच मोरावळा होय.अर्थात पाकात टाकण्यापूर्वी आवळे वाफवून घेतले जातात. योग्य पद्धतीने तयार केलेला मोरावळा पुढे वर्षभर उपयोगी पडतो.आम्लपित्ताच्या,रक्तपित्ताच्या रुग्णांमध्ये मोरावळ्यामध्ये साजूक तुप घालून दिल्यास अतिशय फायद्याचे ठरते. आम्लपीत्तावर आवळकंठीचाही चांगला उपयोग होतो.आवळा वाळवून बनलेली आवळकाठी चघळण्यासाठी वापरल्यास पित्तामध्ये होणारी मळमळ तसेच उलटीची भावना निश्चितपणे कमी होते.

आवळकंठी किसून त्याला थोडे सैंधव (एक प्रकारचे मीठ) लावून पाचक गुणाची सुपारी देखील बनवून ठेवता येते.ती सुपारी अजीर्णावर उपयोगी पडते.आवळ्यापासून बनवला जाणारा वर सांगितलेला मोरावळा ‘अनुपान’(म्हणजे औषधाबरोबर घेण्याचे साधन) म्हणूनही बऱ्याचदा वापरला जातो. अम्लपित्तावर सूतशेखराची मात्रा मोरावळ्यातून घेतल्यास फायदा दिसतो.

‘मधुमेह’ या रोगाचे प्रमाण हल्ली फार प्रचंड प्रमाणात वाढताना दिसत आहे.त्यावरही आवळ्याचा उपयोग करण्यास आयुर्वेदाने सांगितले आहे.आवळ्याचे चूर्ण आणि हळदीचे चूर्ण त्या त्या प्रकृतीनुसार वैद्यकीय सल्ल्याने योग्य प्रमाणात घेतल्यास हे मिश्रण उपयुक्त ठरते.अनेक वैद्य मंडळी या मिश्रणाच्या गोळ्या करून रुग्णांना देतात.

आवळ्यामध्ये असलेला आणखी एक महत्वाचा गुणधर्म म्हणजे ‘वृष्य’ हा होय. या गुणामुळे शरीरातील शुक्र धातू आणि मैथुनसामर्थ्य वाढवण्याचे कार्य आवळ्यामुळे होते.अर्थात यासाठी आवळा वापरतांना वैद्यकीय सल्ला घेणे अनिवार्य असते.

आवळ्यामध्ये याचबरोबर ‘रसायन’हाही गुण आहे.रसायन म्हणजे शरीरातील सगळ्या धातूंना बल देणारा तसेच वार्धक्य-म्हातारपण उशिरा आणणारा.आवळ्याच्या सेवनाने शरीरातील सर्व धातूंना बल मिळते.शरीराची प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते.(च्यवनप्राश) हे सर्व परिचित आयुर्वेदीय औषध सुमारे ३५-३६ औषधी वनस्पतींपासून बनवले जाते.त्यामध्ये ‘आवळा’हा मुख्य घटक असतो.या च्यवनप्राशचा उपयोग शरीरबल ,स्मरणशक्ती वाढवण्यासाठी केला जातो हे सर्वांना माहित आहे.

सुश्रुत या आयुर्वेदीय शल्यविशारदाने आवळा हा डोळ्यांसाठी हितकारक म्हणून सांगितला आहे.आवळ्यामध्ये ‘मलावरोध’ नाहीसा करण्याचाही गुण असतो.त्रिफळा चूर्ण हे सौम्य विरेचन करणारे औषध आवळा,बेहडा आणि हिरडा या तीन फळांचे मिश्रण आहे.

आवळा हा केवळ पित्तदोष कमी करत नाही तर शरीरातील वाढलेले वात-कफ हे दोषही शमवतो.म्हणजे या तीनही दोषांवर आवळा हितकर आहे.अशा प्रकारे आवळा हे एक निसर्गातील उत्तम औषध आहे.