" शिक्षकांचे आरोग्य "

    Date : 05-Sep-2020
|
" शिक्षकांचे आरोग्य "
लेखक : वैद्य विजय कुलकर्णी 
नाशिक  
 
शिक्षक हा आपल्या समाज जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. भावी नागरिक घडवण्याचे पुण्यकर्म शिक्षकाकडून होत असते. या शिक्षकांचा एकूण दिनक्रम तसं पाहिलं तर बुद्धी आणि काही प्रमाणात शरीर या दोहोंनाही ताण देणारा असतो, त्यामुळे साहजिकच त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होताना दिसतो. हा परिणाम टाळायचा असेल तर त्यासाठी करायच्या प्रतिबंधक उपायांची माहिती आपण करून घेणार आहोत.
शिक्षकांची शाळा सकाळची असो की दुपारची त्यांची धावपळ ही ठरलेली, शाळा सकाळची असली तरी झोप कमी होणं सकाळी लवकर आवरुन जावं लागण या गोष्टी ओधाने आल्याच. त्यात 'गृहिणी' शिक्षिका असली तर घरातल्या लोकांची कामे करून मग शाळेत जाण्यासाठी बाहेर पडणं हे तर अधिकच लगबगीच काम, त्यामुळे सकाळचे सगळे कार्यक्रम हे एकामागून एक येऊन आदळत असतात. दंतधावन, आंधोळ, व्यायाम, हे आवश्यक प्रातर्विधी तर नीट झालेच पाहिजेत. ते तसे नीट झाले नाहीत तर दिवस सुस्तीत जातो. हा सगळ्यांचाच अनुभव आहे.
शिक्षकांची शाळा सकाळची असो की दुपारची त्यांनी स्नान करतेवेळी अभ्यंग करण्याचा परिपाठ ठेवलाचा पाहिजे. याचे अनेक फायदे त्यांना होतात. शिक्षकी पेशात खूप वेळ उभ राहव लागतं तसंच नाही म्हटलं तरी दिवसभर चालणं होतं. शाळेतल्या शाळेतसुद्धा टीचर्स रूम पासून वर्गापर्यंत कितीतरी चालून होतं. घरापासून शाळेपर्यंतच्या अंतरावर अवलंबून असलेले पायी चालणही याच्या जोडीला असते त्यामुळे पाय दुखण्याची तक्रार शिक्षकांमधील खूप मोठ्या प्रमाणात आढळते अभ्यंग करताना पायांना तेल लावल्यामुळे पाय दुखण्याचा त्रास शिक्षकांमध्ये टळू शकतो. सतत फळ्यावर शिकवण्याची लिहिण्याची सवय असल्यामुळे शिक्षकांना मान दुखणे बऱ्याचदा सतावते. विशेषतः उजव्या हाताला मुंग्या येणे, हात जड वाटणे अज्ञा तक्रारीही या फळ्यामुळे सतावतात. परीक्षा झाल्यानंतर तपासण्याचे पेपर्स हेही या दुखण्यामागचे एक मोठे कारण असेल का ? कारण एकाच बैठकीत अनेक पेपर्स तपासण्याची सवय बहुतेकांना असते. मानदुखी, हातदुखी यावरही प्रतिबंध म्हणून अभ्यंगाचा चांगला उपयोग होतो. शिकविताना बोलण हाही एक अविभाज्य घटक शिक्षकांच्या दिनचर्येत असतोच असतो. अधिक बोलण्यामुळे ऊर्जा कमी होते. परिणामी शरीरातील बळहीं कमी झालय अस जाणवायला लागतं आणि मग अशक्तपणा जाणवतो. यासाठी शिक्षकांनी गायीचे दूध, शतावरी कल्प, अश्वगंधा चूर्ण थोडी साखर घालून आपल्या रोजच्या न्याहारीत ठेवाव. ( मधुमेहींनी अर्थातच यातली साखर टाळावी ) रस धातू बलवान होण्यासाठी ही उपाययोजना करावी. ज्येष्ठमधाचे चूर्ण आणि दूध यांचे मिश्रण शिक्षकांच्या उपयोगाचे आहे. ज्येष्ठमधाचं चूर्ण मधातून घेतले. तर आवाजावर येणारा ताण निश्चितपणे कमी होतो. ८० विद्यार्थ्यांच्या वर्गात सुमारे ३०-३५ मिनिटे बोलणं ( माईक शिवाय ) सोपे नाही. शिक्षकांमध्ये आणखी एक तक्रार आढळते ती म्हणजे खडूची ॲलजी सतत खडूच्या सान्निध्यात असल्याने त्याचे कण नाकात गेले की शिंका येणे सर्दी होणं खोकला येणे अशा काही तक्रारींना सुरुवात होते यासाठी शिक्षकांच्या दिनचर्येत नस्य या उपक्रमाचा समावेश अवश्य हवा. नस्य म्हणजे नाकात औषध टाकणे होय या नस्याचा उपयोग खडूच्या ॲलर्जीवर तर होतोच पण मानेचं दुखणंही याने कमी व्हायला मदत होते. मानसिक ताण, सततचं व्यवधान या गोष्टी शिक्षकांच्या दिनक्रमात अपरिहार्यच ठरतात. विद्यार्थ्यांना रागावण्याची वेळ दररोज हमखास येतेच त्यामुळे मनावर ताण येतो. प्रत्येक तासाला शिकवण्याचं व्यवधान असल्यानं बुद्धीवरही ताण पडतो. वर सांगितलेले ज्येष्ठमधाचं चूर्ण आणि दूध या मिश्रणाबरोबरच काही योगासनांचा,सूर्यनमस्काराचा अवलंब शिक्षकांनी दिनचर्येत करणे आवश्यक आहे. त्याचा मनस्वास्थ्यासाठी चांगला उपयोग होतो. काही संस्कृत स्तोत्रे रोज म्हणण्याचाही मनस्वाथ्यावर अनुकूल परिणाम होतो.
दुपारची झोप टाळा :-- सकाळची शाळा असणाऱ्या शिक्षक मंडळींना दुपारची झोप ही एक आवश्यक गोष्ट वाटते. पण ती तशी नाही, उलट दुपारी झोपल्याने तब्येतीच्या तक्रारी वाढण्याचीच शक्यता असते. कफ आणि पित्त यांचे प्रमाण वाढतं. शिक्षकांना दुपारची झोप अनावर झाली तर आरामखुर्चीत बसून थोडीशी डुलकी घ्यायला हरकत नाही. पण आडवे पडून झोपणे टाळावं. शाळेत डबा घेऊन जाण्याची सवय काही शिक्षकांनाही असते. डब्यात कोरडे नेऊ नये, काही तरी पातळ असावंच तसेच ब्रेड आणि बेकरीचे पदार्थ टाळावेत, याने पोट व्यवस्थित राहते. एकदा पोट बिघडले की मग त्यामुळे आम्लपित्त, डोकेदुखी अशा अनेक तक्रारी वाढू लागतात. शिकवण्यातही मग लक्ष लागत नाही. म्हणून शिक्षक मंडळीचं पोट ठिकाणावर असणे खूप महत्त्वाचे.