रक्तदान व आयुर्वेद

|

    रक्तदान व आयुर्वेद

वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक)

आयुर्वेद चिकित्सक (नाशिक)

माजी सदस्य, राष्ट्रीय कार्यकारिणी, आरोग्य भारती

. मो. ९८२२०७५०२१

वर्षा ऋतू संपून शरद ऋतूला सुरुवात झाली की यामध्ये पित्तदोष वाढून उष्णतेचे विकार होऊ नये म्हणून आयुर्वेदाने रक्तमोक्षन हे सांगितले आहे. सध्या सुरु असलेलेल्या एकूणच रक्तदान चळवळीला हे रक्तमोक्षन पूरक ठरेल असे सांगणारा हा विशेष लेख रक्तदानास पात्र असणाऱ्या अधिकाधिक व्यक्तींनी रक्तदान करावे. आयुर्वेदीय संकल्पनेचा केलेला सदुपयोग रक्तदान चळवळीला नक्कीच पूरक ठरेल. यासाठी रक्तपेढ्या आणि आयुर्वेदीय चिकित्सक यांचा समन्वय होणे आवश्यक आहे...

रक्तदान केल्याने आपण एका किवा अनेक व्यक्तींचे प्राण वाचवतो, हे सर्वांना माहीत आहे. असे रक्त घेणाऱ्या व्यक्तीला त्याचा फायदा होतोच, पण त्याचबरोबर रक्तदान करत असलेल्या व्यक्तीलाही त्याचा उपयोग होत असतो, हे या ठिकाणी मुदाम लक्षात घ्यायला हवे. हा विचार नीट लक्षात घेतला तर रक्तदानाच्या चळवळीला अधिक चालना मिळेल असे वाटते.

आयुर्वेद या भारतीय वैद्यकाने विशेष अशी पंचकर्म चिकित्सा सांगितली आहे. रक्तमोक्षण हे त्यामाधिल एक महत्वाचे कर्म आहे. रक्तमोक्षण म्हणजे शरीरातील रक्ताचा काही अंश बाहेर काढून घेणे. आयुर्वेदात रक्तदानाचा प्रत्यक्ष उल्लेख नाही. मात्र रक्तमोक्षणाचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात, या कर्मामुळे अनेक रोगान प्रतीबंध होऊ शकतो, तसेच यामुळे अनेक रोग बरे होतात, असे सांगितले आहे. आधुनिक काळात विचारांची जोड दिल्यास रोग प्रतिबंधासाठी रक्तदान करण्याची मानसिकता समाजामध्ये निर्माण होईल असे वाटते.

भारतीय कालमानानुसार शरद ऋतू म्हणजे ऑक्टोंबर हिटचा काल होय. या काळात शरीरात पित्तदोष वाढून रक्त दुषित होऊन अनेक रोग निर्माण होतात. उदानार्थ अंगावर पित्त येणे, तोंड येणे, हातापायाची आग होणे, पायांना भेगा पडणे, डोळे लाल होणे, लघवीला आग होणे, अशा अनेक व्याधी शरीरात निर्माण होतात. असे रुतुजन्य आजार होऊ नयेत म्हणून आयुर्वेदाने या काळात रक्तमोक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. योगायोगाने १ ऑक्टोंबर हा रक्तदान दिन म्हणून सर्वत्र पाळला जातो. त्यामुळे आधुनिक काळातही आयुर्वेदीय संकल्पनेचा आधार घेऊन रक्तदान करण्यासाठी सर्वानीच पुढे यायला हवे.

आयुर्वेदाने रक्ताच्या अशुद्धीमुळे निर्माण होणाऱ्या अनेक रोगांचे वर्णन केले आहे. या रोगांसाठी रक्तमोक्षण हे एक महत्वाची आणि प्रमुईख चिकित्सा म्हणून सांगितली आहे. असे रोग होऊ नयेत म्हणूनही रक्तमोक्षणाचा अवलंब आयुर्वेदात केला जातो. रक्ताच्या अशुद्धीमुळे पुढील रोग होतात. तोंड येणे, लघवीतून रक्त येणे, खूप तहान लागणे, तोंडाला चव नसणे, आंबट ढेकर येणे, तोंड खारट होणे, आवाज खोल जाणे, अंगावर पित्त येणे, डोळ्यांचे रोग, छोट्या सांध्यांवर सूज येणे (वातरक्त), अंग जड होणे, डोकेदुखी, श्रम न करता थकणे, खूप घाम येणे, ग्लानी येणे, त्वचेवर पुटकुळ्या येणे, पोटात गोळा येणे, गळू होणे, त्वचेचा रंग बदलणे, अंग गरम असणे, अन्नाचे पचन नीट न होणे, शरीराला दुर्गंधी येणे, खूप झोप येणे, त्वचारोग, नागीण, स्त्रियांच्या अंगावर जाणे, पचनशक्ती मंद होणे, खूप थकवा येणे, अंगाला खाज येणे इत्यादी.

या सर्व रोगांना टाळण्यासाठी रक्तमोक्षण आवश्यक आहे. रक्तदान केल्यास त्या रक्तदात्याला या सर्व रोगांपासून स्वतःचा बचाव करता येईल, तसच वरीलपैकी एखादा रोग कोणाही व्यक्तीला झाल्यास आणि ती व्यक्ती आधुनिक परिमानानुसार रक्तदान करण्यास पात्र असेल तर त्या रोगाची चिकित्सा म्हणूनही रक्तदाणाचा उपयोग होईल. हल्ली त्वचाविकारांचे प्रमाण बरेच वाढले आहे. अनेक प्रकारचे त्वचारोग रक्ताच्या अशुधीमुळे निर्माण होतात. अशा त्वचारोगांसाठी रक्तमोक्षण ही एक उत्तम चिकित्सा आहे. आयुर्वेदाने रक्तमोक्षण करण्यापूर्वी काही प्रमाणात गाईच्या तुपाचे सेवन करण्यास सांगितले आहे. सध्याच्या काळात रोग प्रतीबंधानासाठी रक्तदान करुण्यापुर्वी वैद्यांच्या सल्ल्याने गाईचे तूप सेवन केल्यास तेही उपयुक्त ठरेल. रक्तदानानंतर काही दिवसांतच दिलेले रक्त शरीरात तयार होते आणी अशुध्द रक्तामुळे होणाऱ्या रोगांना आपण दूर ठेवू शकतो. या विश्वासाने रक्तदान दिनाच्या निमित्ताने ऑक्टोबर महिन्यात रक्तदानास पात्र असणाऱ्या अधिकाधिक व्यक्तींनी रक्तदान करावे. तसे केल्यास रक्तदान करण्यारया आणि रक्त घेणाऱ्या अशा दोघानाही याचा आरोग्यदायी लाभ होईल आयुर्वेदीय संकल्पनेचा केलेला सदुपयोग रक्तदान चळवळीला नक्कीच पूरक ठरेल, असा विश्वास वाटतो. यासाठी रक्तपेढ्या आणि आयुर्वेदीय चिकित्सक यांचा समन्वय होणे आवश्यक आहे.

अर्थात शरद ऋतू सोडून देखील रक्तमोक्षण व्याधीला अनुसरून करता येऊ शकते त्यामुळे एरव्ही देखील रक्ताचे विकार असणाऱ्या व्यक्तींनी रक्तदान केल्यास त्याचा सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने दुहेरी फायदा होऊ शकतो. रक्तदाता आणि रक्ताची गरज असलेला रुग्णया दोघानाही आरोग्य टिकवण्यासाठी या रक्तदानाच्या उपयोग होऊ शकेल. अर्थात यासाठी रक्तदाता हा आधुनिक परिमाणानुसार रक्तदानाला पात्र असला पाहिजे. प्राचीन भारतीय शास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असे आधुनिक शास्र या दोन्ही शास्त्रांचा समन्वय साधून आपण सामाजिक आरोग्य चांगले राखण्यासाठी असे प्रयत्न करू शकतो. वर सांगितल्या प्रामाने रक्तपेढ्या आणि आयुर्वेदिक चिकित्सक यांनी एकत्रितपणे याबाबत विचार मंथन केल्यास ते उपयुक्त ठरेल यात शंका नाही.