आहाराचे महत्व

|

आहाराचे महत्व

वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक)

मो. ९८२२०७५०२१

शरीर आणि बुद्धी यांच्या वाढीसाठी पोषणासाठी अत्यावश्यक असणारा दिनचर्येतील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे आहार होय. सकस आहार आपल्याला निरोगी ठेवतो तर आहार योग्य रीतीने, योग्य प्रमाणात, योग्य वेळी न घेतल्यास शरीरामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते. आयुर्वेदशास्त्राने आहारघटकाला अतिशय महत्वाचे मानलेले आहे.

ज्याप्रमाणे मोटारचे इंजिन त्यामध्ये पेट्रोल भरल्याशिवाय सुरु होत नाही. त्याचप्रमाणे शरीराचे कार्य व्यवस्थित चालविण्याची आहाराची अत्यंत आवश्यक्यता असते. तो कमी झाल्यास कुपोषणजन्य व्याधी निर्माण होतात. भारतामध्ये आजही या प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त असलेल्यांची संख्या खूप मोठी आहे. योग्य प्रकारे आहाराचे सेवन न केल्यास अतिपोषनामुळे देखील विविध व्याधींनी ग्रस्त झालेल्या व्यक्ती पहावयास मिळतात. अशा व्यक्तींमध्ये आहार तर भरपूर घेतला जातो पण त्यापासून मिळणारी उर्जा ही योग्य पकारे वापरली जात नाही.

आहाराच्या विविध पद्धती

आपल्या देशामध्ये विभागपरत्वे आहाराच्या विविध पद्धती आढळतात. उत्तरेकडील लोकांच्या आहारात गहू, दाली याचे प्रमाण जास्त तर दक्षिणेकडील लोकांमध्ये तांदळाच्या पदार्थांचे प्रमाण अधिक आढळते. ग्रामीण भागातील लोकांचा आहार आणि शहरी भागातील लोकांचा आहार यामध्येही भिन्नता आढळते. मनुष्यप्राणी ज्या विभागात राहतो त्या विभागात निर्माण होणाऱ्या अन्नधान्यांचा उपयोग आहाराआठी करीत असतो. ही त्याची स्वाभाविक प्रवृत्ती आहे.

आयुर्वेदातील वर्णन

आपले आरोग्य बर्याच अंशी आहारावर अवलंबून असते असे आयुर्वेद शास्त्राने मानले आहे. आपल्या शरीराचे धारण करणारे एकूण ७ धातू आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे ते ७ धातू होत. या सातही धातूंचे बळ योग्य प्रमाणात वाढवण्यासाठी, त्यांची योग्य ती वाढ करणार्या आहारद्रव्यांची शरीरास गरज असते.

वर सांगितलेल्या धातुच्या आश्रयाने आपल्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ हे तीन घटक (ज्यांना आयुर्वेदाने त्रिदोष असे संबोधले आहे.) कार्यकारी असतात. ते संपूर्ण शरीराचा व्यापार चालवतात. आहारामध्ये झालेल्या बदलाचा परिणाम या दोषांवरही होत असतो. आहाराच्या कमी अधिकपणामुळे, किवां आहारासंदर्भातील काही कारणांमुळे या त्रिदोषांच्या कार्यात बिघाड उत्पन्न होऊन शरीरामध्ये विकृती निर्माण होते. म्हणजेच व्याधींची निर्मिती होते. यावरून असे लक्षात येते की आहार हा घटक अयोग्य पद्धतीने शरीरात गेला तर तो व्याधीच्या निर्मितीस कारणीभूत ठरू शकतो.

सकस आहाराची संकल्पना

आपला आहार हा षड्रसयुक्त (६ रसांनी युक्त) असावा, असे आयुर्वेद शास्त्राने सांगितले आहे. मधूर, आंबट, तिखट, कडू, खारट आणि तुरट हे ते सहा रस (म्हणजे चवी) होत. या सहाही रसांच्या (चवीच्या) पदार्थांचा सामावेश आपल्या आहारात असला पाहिजे, म्हणजेच तो सर्वार्थाने पोषक असा आहार होतो. या ६ रसांच्या द्रव्यांची अनेक उदाहरणेही ग्रंथामध्ये दिलेली आहेत.

आहारद्रव्यांचे वर्गीकरण

विविध आहारद्रव्यांचे वर्गीकरणही आयुर्वेद संहीताम्ध्ये अतिशय विचारपूर्वक केलेले आढळते. त्यामध्ये शुकधान्य (तांदूळ व त्याचे प्रकार व गहू जव इ.) शमीधान्य, मांसवर्ग इ. विविध आहार प्रकार वर्गीकृत केलेले आहेत. आहार घेण्याच्या विविध बद्दलचे मार्गदर्शनही या शास्त्राने अतिशय सविस्तरपणे केलेले आहे. विविध आहारद्रव्यांच्या शरीरावर होणाऱ्या परिणामानचेही वर्णन यामधून आढळते.

आयुर्वेदाने आहाराच्या संदर्भात अनेक मार्गदर्शक तत्वे सांगितलेली आहेत. दोन अडीच हजार वर्षापूर्वी सांगितलेली तत्वे आजही तशीच तशी लागू पडतात. यावरून त्याचे महत्व किती आहे हे लक्षात येते आणि त्यामधील शाश्वतता सिद्ध होते. आहाराच्या गुणांचे वर्णन करतांना चरक हा आयुर्वेदीय ग्रंथकार म्हणतो. की-

अन्न (आहार) हे सर्व प्राण्यांचा प्राण आहे. आपला वर्ण, स्वर चांगला असणे, आपले जीवन, आपली प्रतिभाशक्ती, संतोष, सुख, शरीराची पुष्टी, शरीरबल, बुद्धी (मेधा) या सर्व गोष्टी आहारावर अवलंबून आहेत.

आहाराचे हे महत्व सर्वांनी ध्यानात घ्यावे. सकाळची न्याहारी, दुपारचे भोजन, रात्रीचे भोजन अशा विविध स्वरूपात आपण आहार सेवन करीत असतो. आहाराचे हे महत्व ध्यानात घेऊन आपल्या आहाराकडे नीट लक्ष पुरविले पाहिजे.

या आहाराच्या उप्लाब्धीनुसार आपला शरीरधर्म असतो हे सर्वानी लक्षात ठेवावे.