दमा आणि आयुर्वेद

|

      दमा आणि आयुर्वेद

लेखक : वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक)

मो. ९८२२०७५०२१

आयुर्वेद चिकित्सक,संपादक आरोग्य चितन

   हिवाळ्यातील थंडी आणि पावसाळ्यातील ढगाळ हवामान दम्याच्या रुग्णांना त्रासदायक ठरू शकते. नेहमीच्या अनुभवामुळे या रुग्णांना हिवाळा आणि पावसाळा जवळ येऊ लागला की अस्वस्थता वाटू लागते. अनेकजण या विकाराने त्रस्त असतात. या विकाराच्या चिकित्सेसाठी आयुर्वेद्शास्त्राने मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे. दम्याची कारणे, लक्षणे उपचार यासंबंधी सविस्तर उहापोह आयुर्वेदाने केलेला आहे. या विकाराचे आयुर्वेदाने श्वास असे नामकरण केलेले आहे. याचे परत एकूण ५ (पाच) प्रकार पडतात. त्यामध्ये तमकश्वास हा प्रकार व्यवहारात नेहमी आढळतो. याला आधुनिक परिभाषेत अस्थमा असे म्हटलेले आहे.

तमकश्वासामध्ये दम्याचे वेग (Attack) येतात. यामध्ये श्वास घेण्याला अतिशय त्रास होतो. जीव घाबरा होतो. डोळ्यापुढे अंधारी आल्यासारखी वाटते. खोकल्याची उबळ येते, कफ नीट सुटत नाही. तो पडून गेल्यावर मात्र बरे वाटते.

थंड हवामानात, ढगाळ हवामानात असा त्रास होण्याची शक्यता असते.

दम्याची कारणे :

आयुर्वेदाने वात आणि कफ या दोन शरीर घटकांनमधील असमतोल हे दम्याचे कारण सांगितले आहे. हा असमतोल निर्माण होण्याला अनेक कारणे घडतात.

धूळ, धूर यांची शरीराशी असलेली असात्म्यता (अलर्जी) अतिशय आंबट पदार्थ नेहमी खाणे (उदा. दही), अतिशय थंड पदार्थांचे सेवन अति प्रमाणात व नेहमी करणे, कफवर्धक घटकांचा खाण्यात अति उपयोग करणे यामुळे दम्याचा त्रास उद्भवू शकतो. अनुवांशिकता ही देखील दम्याला कारणीभूत ठरते. म्हणून ज्यांच्या कुटुंबात दम्याचा इतिहास आहे त्यांनी आपल्या मुलांच्या आहार विहारावर लहांपानासूनच योग्य नियंत्रण ठेवायला हवे. हल्ली लहान मुलांमध्ये आईस्क्रीम, शीतपेये आदींच्या सेवनाचे प्रमाण वाढत चाललेले दिसते आहे. दम्याचा त्रास असणाऱ्या पालकांच्या मुलांनी (वरील पदार्थांचे) अति सेवन करणे हे धोकादायक ठरू शकते. दम्याच्या रुग्णामध्ये फुफ्फुसातील श्वासनलीकांचे स्नायू आकुंचन पावतात. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढा प्राणवायू मिळत नाही आणि श्वासोछावासाला अडथळा निर्माण होतो. फुफ्फुसामध्ये जास्त प्रमाणात कफाचा संचय झाल्यासही दम्याचा त्रास होऊ शकतो. हृदयरोगी, पांडुरोग यामध्ये दम लागणे हे लक्षणे असते. त्या त्या विकारांची योग्य ती चिकित्सा केल्यास दम लागणे कमी होते.

उपचारांची दिशा :

दम्याची कारणे, लक्षणे बघितल्यावर मुख्य भाग उपचारांचा राहतो. आयुर्वेदाने या उपचारांचे सविस्तर वर्णन केलेले आहे. कफ आणि वात या दोषांमध्ये समतोल निर्माण करणे हा या उपचारांचा प्रमुख भाग असतो. अतिसंचीत कफामुळे निर्माण होणाऱ्या दम्यामध्ये कफ हा घटक कमी प्रमाणात निर्माण होईल अशी व्यवस्था करावी लागते. म्हणजे दम्याच्या मूळ कारनांणपर्यंत आयुर्वेद उपचार पद्धती पोहोचते. कफ जास्त प्रमाणात होण्याची प्रवृत्ती एकदा कमी झाली की मग दम्याची तीव्रता कमी होते.

दम्याच्या रुग्णांनी केळी, गार दूध, मासे, दही, थंड पाणी यांचे सेवन टाळणे हाही आयुर्वेदीय उपचारातील मुख्य भाग आहे. अर्धा चमचा आल्याचा रस आणि एक चमचा मध हे मिश्रण सकाळच्या वेळात घेणे, इतर काही कफनाशक द्रव्यांचा वापर करणे, गरम पाण्याचे सेवन करणे आदी आयुर्वेदीय पद्धतीचे उपचार (वैद्याच्या मार्गदर्शनाखाली) केल्यास या विकारात फायदा होऊ शकतो.

दम्याचा वेग आल्यास कोमट केलेले तिळाचे तेल व त्यामध्ये थोडेसे सैंधव टाकून टे छातीला चोळून थोडा शेक घेतल्यास कफ पातळ होऊन बरे वाटते. अर्थात हा उपायही वैद्यकीय मार्गदर्शनाखाली करणेच योग्य.

प्राणायाम योग्य व शास्त्रीय पद्धतीने करणे हादेखील दम्याच्या उपचारांमधील महत्वाचा भाग आहे.

आयुर्वेदाने जी पंचकर्मे सांगितली आहेत. त्यामधील वमन हे कर्म दम्याच्या रुग्णांमध्ये महत्वाचे व उपयुक्त ठरू शकते. कफसंचय होण्याची शारीरिक प्रवृत्ती या विधीवाटे कमी होते. कारण या विधीद्वारे उलटीवाटे कफ शरीराबाहेर टाकला जातो. कफाच्या निर्मितीवरही याचा परिणाम होतो. या विधीप्रमानेच काही रुग्णांमध्ये विरेचन या विधीचाही उपयोग होतो. अर्थात हेदेखील वैद्याच्या सल्ल्यानेच करावयाचे असते.

अशाप्रकारे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात पावसाळ्यात त्रासदायक ठरू शकणारा हा दम्याचा विकार योग्य ती काळजी घेतल्यास नियंत्रणात राहू शकतो. आहार-विहारावर योग्य नियंत्रण असल्यास हा त्रास वाढत नाही. म्हणूनच वर दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करावा.