चेहऱ्याचे सौंदर्य

|

काही उपायांनी अधिकच खुलून दिसणारे

चेहऱ्याचे सौंदर्य

लेखक वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक)

मो. ९८२२०७५०२१

प्रत्येक व्यक्तीस आपल्या सौंदर्याची काळजी असते. परंतु ती काळजी नेमकी कोणत्या पद्धतीने घ्यावी, यासंबंधी मोठ्या प्रमाणावर अज्ञान आढळते. या अज्ञानापायी चांगले मुख (चेहरा) असणारे देखील बाजारात मिळणाऱ्या विविध क्रीम्स किवा इतर सौंदर्य वर्धक वस्तूंचा उपयोग करीत असतात. सौंदर्य टिकविण्यासाठी काही कृत्रिम उपायही करण्याची प्रथा दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यासंबंधी खरोखरच वैद्यकीय दृष्टीने सर्वानी विचार करावयास हवा, असे वाटते.

चेहऱ्याचे स्वरूप, आकार, त्याचा वर्ण ही निसर्गाची देणगी असते, परंतु तो तुकतुकीत दिसणे, तेजस्वी दिसणे, उत्साहपूर्ण दिसणे ही प्रत्येकाच्या हातात असणारी गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या चेहऱ्याची नीटपणे रोज काळजी घेणे हे प्रत्येकाचेच कर्त्यव्य ठरते. तरुण-तरुणींमध्ये सौंदर्याबद्दलची विशेष सतर्कता आढळून येते. ज्या वेळेस बाल अवस्थेपासून तारुण्यावस्थेत त्यांचे पदार्पण होते, त्या वेळेस बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर विविध पुटकुळ्या, मुरूम आल्यामुळे त्यांच्यामध्ये मानसिक अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असते. काही व्यक्तींना अतिशय तिखट, अतिशय आंबट, अशा चवीचे पदार्थ खाण्याची असलेली सवय, अति चहापान, अति जागरण यांचे सातत्य त्यामुळेही चेहऱ्यावर पुटकुळ्या येण्याचा त्रास होतो. रक्तामधील असणाऱ्या अशुधीचा परिणाम चेहऱ्यावर होतो, असे आयुर्वेद शास्त्र सांगते.

तेव्हा वरील काही तक्रारी निर्माण न होण्यासाठी चेहऱ्याची नित्य काळजी घ्यावी लागते. रोज स्नानाचे वेळेस शक्य असल्यास थोडे दूध त्यामध्ये थोडी हळद घालून चेहऱ्यास लावावे, म्हणजे चेहरा सतेज राहतो.

दूध आणि डाळीचे पीठ असेही मिश्रण स्नानाचे वेळी लावल्यास चेहऱ्याच्या सौंदर्यात नक्कीच भर पडते. यामुळे कोणतेही कृत्रिम द्रव्य चेहऱ्यास बाहेरून लावण्याची आवशकता भासत नाही.

बाहेरून फिरून आल्यावर तसेच सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुण्याची सवय ठेवल्यास चेहऱ्याचे सौंदर्य टिकण्यास मदत होते.

आयुर्वेदाने चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी व आपला वर्ण उजळन्यासाठी काही विशिष्ट औषधींचा उल्लेख (वर्ण खुलवणारा) असा केलेला आहे. या औषधींचा उपयोग चेहऱ्याचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी बाह्यता तसेच पोटातून घेतल्यासही होतो. बाह्य उपयोगासाठी आयुर्वेदाने मुखलेप या विधीचे वर्णन केलेले आहे. या मुखलेपाचे रोज धारण केल्यास चेहरा अतिशय तेजस्वी होतो.

या मुखलेपाचा उपयोग मुरूम-पुटकुळ्यानी बिघडलेला चेहरा स्वच्छ करण्यासाठी सुद्धा होतो. ही मुखलेप कल्पना आजच्या काळातही तितकीच महत्वाची ठरलेली आहे, असे दूसून येते. चंदन, वाळा आदी औषधीपासून तयार केलेला लेप वैद्यकीय सल्ल्याने विशिष्ट वेळ चेहऱ्यावर धारण करावा. तो लेप चेहऱ्यावर पूर्णतः वाळू देऊ नये. वाळल्यावर लेप काढला असता चेहऱ्याला इजा होण्याची शक्यता असते, कारण अशा परिस्थितीत तो लेप खरवडून काढावा लागतो.

चंदन, वाळा या खेरीज सारीवा (अनंतमूळ), मंजिष्ठा, जेष्ठमध, कमाल लोध्र, हरिद्रा, जटामांसी ए. औषधी वर्णे म्हणून संबोधल्या आहेत. या सर्वांचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने आयुर्वेदाने करून घेतलेला आहे. अनेक वैद्य मंडळी काही विशिष्ट मुखलेप बनवून रुग्णांवर त्यांचा वापर करताना आढळतात. हे मुखलेप चेहऱ्यावर लावण्यासाठी पाणी, दूध, लिंबाचा रस अशा विविध माध्यमांचा उपयोग करता येतो. हा उपयोग करताना वैद्यकीय सल्ला घेतल्यास चांगले.

केवळ बाह्यपचार नकोत

अर्थात चेहऱ्याचे सौंदर्य हे केवळ या लेपांवर म्हणजे बाह्य उपचारांवर अवलंबून नसते. अनेकदा कोठा साफ नसला तरीही चेहऱ्यावर काही प्रमाणात मुरूम, पुटकुळ्या येतात. मागे वर्णन केल्याप्रमाणे रक्तातील अशुद्धी हेही याचे कारण असू शकते. तेव्हा उपचारांमध्ये हाही भाग विचारात घ्यावा लागतो.

ज्यांना मुरूम, पुटकुळ्याचा सतत त्रास होतो, अशांनी स्वतःहून काही औषधी योजना करण्याएवजी आपल्या वैद्यांकडून त्याची नीट माहिती करून घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, हे उत्तम. उगाचच कृत्रिम उपायांचा स्वतःहून उपयोग केल्यास चेहरा अधिक बिघडण्याची शक्यता असते.

वयात आलेल्या तरुण मुलांनी आपल्या दाढीचे केस रोज नियमितपणे काढणे हे त्यांच्या चेहऱ्याच्या सौंदर्याच्या व आरोग्याच्या दृष्टीने हितावह असते.

चेहऱ्याचे सौंदर्य ही अतिशय नाजूक बाब असल्याने त्याचा सविस्तर उहापोह येथे आहे. त्यासंबंधी सूचनांचे पालन केल्यास ते सौंदर्य अधिक खूलण्यास मदत होईल.

कृत्रिम सौंदर्य प्रसाधने टाळा :

सध्या जाहिरातींमुळे कृत्रिम रसायनांनी युक्त अश्या सौंदर्य प्रसाधनांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे. चेहऱ्याला विविध क्रीम्स ओठाला लिपस्टिक्स अशा अनेक गोष्टींचा मेकअप करण्याची खूप जणांना सवय असते सातत्याने कृत्रिम सौंदर्य प्रसाधने वापरली तर त्वचेवर त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांचा वापर टाळून या लेखात वर सांगितलेल्या विविध नैसर्गिक उपायांचा अवलंब करणे यातच आपल्या चेहऱ्याचे हित आहे. यात शंका नाही.