हिवाळा आणि श्वसन संस्थेचे आजार

    Date : 16-Jan-2026
|

Winter and respiratory diseases
 
डॉ. विकास रामचंद्र रत्नपारखे
डॉ. हेडगेवार रूग्णालय, छत्रपती संभाजीनगर
 
श्वासनलिका या फुफ्फुसात हवा आत घेऊन जातात आणि बाहेर काढतात. हिवाळ्यात हवा शुष्क आणि थंड असते. अशा हवेमध्ये श्वासनलिका आकुंचन पावतात. यामुळे दमा, ब्राँकायटिस आणि श्वास नलिकांचे इतर विकार असलेल्या व्यक्तींना हिवाळ्यामध्ये श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. आणि याच काळात फ्लूचा संसर्ग पण वाढतो आणि हेच संसर्ग श्वसनविकार बळावण्यास कारणीभूत ठरतात. या श्वासनलिकांचा दाह (इन्फेक्शन) म्हणजेच ब्रॉन्कायटिस होय. या संसर्गामध्ये श्वासनलिकांच्या अस्तराला सूज येते. ज्यामुळे तीव्र असा खोकला येतो आणि घट्ट म्युकस (कफ) बाहेर पडतो आणि बऱ्याचवेळा दम सुद्धा लागतो. याचे प्रामुख्याने २ प्रकार असतात तीव्र (ACUTE) किंवा जुनाट (CHRONIC). तीव्र ब्राँकायटिस हा सहसा विषाणूजन्य संसर्गामुळे हा सहसा विषाणूजन्य संसर्गामुळे होतो आणि लवकर बरा सुद्धा होतो. तर क्रॉनिक ब्राँकायटिस हा दीर्घकाळ टिकणारा आजार आहे. यालाच क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी विकार असेही म्हणतात. जुनाट ब्राँकायटिस अधिक गंभीर असतो आणि धूम्रपानामुळे हा विकार बळावतो. ब्राँकायटिसची सामान्य लक्षणे म्हणजे सततचा खोकला ज्यामध्ये घट्ट म्युकस (कफ येतो, छातीत दुखते आणि थकवा जाणवतो.
 
तीव्र ब्राँकायटिस म्हणजे काय ?
 
तीव्र ब्राँकायटिस ही फुफ्फुसातील श्वासनलिका (BRONCHI) आणि संबंधित इंद्रियांना आलेली सूज होय. या नलिका फुफ्फुसातून हवा आत आणि बाहेर नेण्याचे काम करतात. जेव्हा या नलिकांमध्ये सूज येते तेव्हा हवेचा मार्ग संकुचित होतो ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि खोकला येतो. तीव्र ब्राँकायटिस हा सामान्यतः विषाणूजन्य संसर्गामुळे होतो. याची लक्षणे साधारणतः ३ आठवड्यांपेक्षा कमी काळ टिकतात. तीव्र ब्राँकायटिसची लक्षणे ही सामान्य सर्दीसारखीच असतात परंतु खोकला जास्त काळ टिकतो,
 
खोकलाः सुरुवातीला कोरडा खोकला येतो आणि नंतर तो कफयुक्त होतो. असा खोकला २ ते ३ आठवड्यांपर्यंत राहू शकतो.
 
कफः हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचा घट्ट कफ पडू शकतो. छातीत जडपणा जाणवू शकतो. श्वास घेताना धाप लागू शकते. थकवा जाणवू शकतो. संपूर्ण शरीरात वेदना जाणवतात, हुडहुडी भरते आणि ताप येऊ शकतो.
 
तीव्र ब्राँकायटिसची काही प्रमुख कारणेः विषाणूजन्य संसर्गः प्रौढांमधील ८५-९५% तीव्र ब्राँकायटिसची प्रकरणे सामान्य सर्दी (Rhinovirus) किंवा फ्लू (Influenza) या सारख्या विषाणूंमुळे होतात.
 
जिवाणूजन्य संसर्गः कचित प्रसंगी, जिवाणूंच्या संसर्गामुळे (उदा. डांग्या खोकल्यास कारणीभूत ठरणारे जिवाणू) देखील ब्राँकायटिस होऊ शकतो.
 
आजारात भर टाकणारे घटकः धूर, धूळ, प्रदूषण किंवा रासायनिक धुरामध्ये श्वास घेतल्याने श्वासनलिकांमध्ये जळजळ होऊ शकते ज्यामुळे ब्राँकायटिस बळावू शकतो.
 
उपचारः तीव्र ब्राँकायटिसचे उपचार हे बहुतेकवेळा सिम्प्टोमॅटिक म्हणजेच लक्षणांवर नियंत्रण मिळवण्यासाठीच असतात. हा आजार विषाणूजन्य असल्यामुळे प्रतिजैविकांची आवश्यकता नसते. पुरेशी विश्रांती घेणे. भरपूर द्रवपदार्थाचे सेवन करणे ज्यामुळे कफ पातळ होण्यास आणि बाहेर पडण्यास मदत होते. हवेत ओलावा वाढवण्यासाठी ह्युमिडिफायर वापर इष्ट आहे. वाफ घेतल्याने श्वसनमार्ग ओलसर राहतो आणि कफ सुटण्यास मदत होते. अंगदुखी आणि तापापासून आराम मिळण्यासाठी आयबुप्रोफेनसारखी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येऊ शकतात. लक्षणे तीव्र स्वरूपाची असतील किंवा २/३ दिवसात कमी झाली नाही तर वैद्यकाशी त्वरित संपर्क साधा. उच्च ताप असणे, कफामध्ये रक्त पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा घरघर होणे. ही गंभीर आजाराची लक्षणे आहेत. तीव्र ब्राँकायटिसचा आजार कधीकधी अधिक गंभीर होऊ शकते त्याची परिणती न्यूमोनिया, दमा बळावणे, सेप्सिस, श्वसन घेण्यास असमर्थता होणे (आर.डी. एस), दुय्यम बॅक्टेरियाचे संक्रमण (सेकंडरी इन्फेक्शन) यामध्ये होऊ शकते.
 
प्रतिबंधात्मक उपायः साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा, विशेषतः आपल्या चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी सॅनिटायझर वापरा. धूम्रपान आणि फुफ्फुसांना त्रास देणारे इतर (धूळ, रासायनिक धूर आणि श्वासनलिकांसंबंधी जळजळ होऊ शकणाऱ्या तीव्र वास). सारख्या त्रासदायक घटकांचा संपर्क कमी करा. खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाका आणि आजारी व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळा. घराबाहेर पडताना आपले नाक आणि तोंड स्कार्फने किंवा मास्कने झाका. घरात हवा खेळती ठेवा आणि ह्युमिडिफायरचा वापर करा. हिवाळ्यात थंड पदार्थाचे सेवन टाळा, श्वसन संक्रमण टाळण्यासाठी फ्लू शॉट्स आणि न्यूमोकोकल लसी या वैद्यकाच्या सल्ल्याने घेता येऊ शकतात. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा आणि वारंवार हात धुवा. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करा. प्रतिबंध उपचारांपेक्षा नेहमीच चांगला असतो, त्यामुळे मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि धूम्रपान टाळणे हे श्वसनविकार टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे. श्वसनविकार असलेल्यांनी हिवाळ्यात डॉक्टरांच्या नियमित संपर्कात राहावे आणि त्यांनी सांगितलेली औषधे वेळेवर घ्यावीत.
 
📞 संपर्क: 9822435503