आरोग्यदायी अभ्यंगस्नान

|

आरोग्यदायी अभ्यंगस्नान

लेखक :- वैद्य. विजय कुलकर्णी.

आयुर्वेद चिकित्सक (नाशिक)

सदस्य राष्ट्रीय कार्यकारिणी आरोग्य भारती

मो. ९८२२०७५०२१

        शनिवार दिनांक २९ ऑक्टोबर २०१६ रोजी नरक चतुर्दशीच्या निमित्ताने आपण अभ्यंगस्नान करतो. त्याचे आरोग्यदायी महत्व सांगणारा हा विशेष लेख...

दिवाळीच्या निमित्ताने आपण सारे अभ्यंगस्नान करतो. स्नानापूर्वी अंगाला तेल लावतो. ही प्रथा खूप पूर्वीपासून आपल्याकडे आहे. श्रीकृष्णाने नराकासुराचा वध केला आणि तो जिंकून आल्यावर त्याला अभ्यंगस्नान घातले अशी कथा आहे. हा विजयोत्सव दिवाळीला साजरा आपण करतो. पण या निमित्ताने अभ्यंगस्नान सुरु करणे खरे महत्वाचे आहे. आपण उत्तम आरोग्यासाठी रोज आपल्या अंगाला तेल लावले पाहिजे. आयुर्वेदाने आपल्या रोजच्या दिनक्रमात याचा समावेश करावा असे सांगितले आहे. रोज अंगाला तेल लावून स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान होय. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे शरीरात वातदोष वाढत नाही. जरा म्हणजे म्हातारपण उशिरा येते.श्रम करण्याची क्षमता त्यामुळे निर्माण होते. अभ्यांग हे श्रमजीवी आणि बुद्धीजीवी या दोन्ही वर्गांना उपयोगी ठरते. याने आपली त्वचा उजळते. तेजस्वी होते. तुकतुकीत होते.त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत.त्यामुळे वार्धक्य लवकर येत नाही. हल्ली अनेकांच्या त्वचेवर चालीशितच सुरकुत्या यायला सुरुवात होते. अवेळी या अभ्यंगस्नानचा खूप उपयोग होतो. सांधेदुखी होऊ नये म्हणूनही अंगाला तेलाचे अभ्यंग केल्याचा उपयोग होतो. इतकेच नाही तर सांधेदुखीवर उपाय म्हणूनही अभ्यान्गाचा अप्रतिम उपयोग होताना दिसतो.

अंगाला तेल लावताना ते विशेषकरून आपले डोके, कान,पाय याना करावे. डोक्याला दररोज तेल लावल्याने डोके शांत राहाते. केस काळे रहातात. लवकर गळत नाहीत. कानात रोज तेल घातल्याने कानाचे कार्य उत्तम चालते. कानात तेल घालताना ते थोडेसे तापवून घ्यावे. ते शुद्ध असावे.असे असल्यास त्याचा कानाला कोणताही त्रास होत नाही. हल्ली कानाला तेल न लावण्याची तसेच डोक्याला तेल न लावण्याची एक विचित्र स्पर्धा सुरु झालेली दिसते. ती हितावह नाही. तेल हे पायांनाही विशेषत्वाने लावण्यास आयुर्वेदाने सांगितले आहे. त्यामुळे पाय दुखत नाहीत. तळपायांना तेल लावल्यास डोळ्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. अभ्यंगाने आपले शारीर पुष्ट होते. लहान बाळाला अगदी बालपणापासूनच अभ्यंग करावे. लहान मुलांच्या कुपोषणावर अभ्यंग हा एक उत्तम उपाय आहे हे लक्षत घेवून या समस्येच्या निर्मूलनासाठीही या अभ्यान्गाचा उपयोग करून घ्यायला हवा, आपली त्वचा दृढ करायलाही याचा खूप चांगला उपयोग होतो. त्वचेच्या काही विकारात याने फायदा होतो.

अभ्यंगस्नानासाठी सर्वात श्रेष्ठ म्हणून तिळाचे तेल होय. या तेलात चंदन, जेष्ठ्मध, बला, शतावरी अशा वनस्पतींचा काढा करून तो उकळला जातो. त्यात गायीचे दूध टाकले जाते. दुधामुळे हे तेल अतिशय स्निग्ध होते. त्याने त्वचेची रुक्षता कमी होते. अजीर्ण, कफाचे विकार झाले असल्यास मात्र अभ्यंग करू नये असे आयुर्वेद सांगतो.

अभ्यंगस्नानासाठी अंगाला उटणे लावावे. अशा प्रकारे या दिवाळीच्या निमिताने आपण अभ्यंगस्नानाचा संकल्प करून पुढे रोज आपल्या दिनचर्येत त्याचा समावेश केला तर आपले आरोग्य उत्तम राहू शकेल असा विश्वास वाटतो.