आहार सेवन विधी

    Date : 07-Aug-2021
|
वैद्य: विजय कुलकर्णी (नाशिक)
मो. ९८२२०७५०२१

आयुर्वेद्शास्त्राने सांगितलेला आहार सेवन विधी पाहाणे संयुक्तिक ठरेल. कारण आहाराच्या बाबतीत इतर सर्व गोष्टींची माहिती असेल व काही आहारतत्वे पाळली, पण आहार सेवन विधीचे वर्णन अभ्यासले नाही तर त्याचा फायदा होणार नाही. किंबगूना ती माहिती अपुरी राहील. यासाठी आहार सेवन विधी माहित करून घेणे हे क्रमप्राप्त होय. तेच या लेखाचे प्रयोजन आहे.
चरक या आयुर्वेदीय विद्वान वैद्याने आहाराच्या सेवनाचा विधी सांगितला आहे.
उष्ण, स्निग्ध गुणाचा, मात्रापूर्वक,(योग्य प्रमाणात) आधीचा आहार पचाल्यावर, विरुध्द नसणारा असा आहार, अधिक घाई न करता अशा प्रकारे आहाराचे सेवन करावे. आहाराचे सेवन खूप हळूहळूही करू नये. त्याचप्रमाणे खूप बोलता बोलता तसेच खूप हसत हसत आहार सेवन करू नये. मन प्रसन्न ठेवूनच आहार सेवन करावा. योग्य अशा प्रदेशातच अन्न सेवन करावे.
एवढया सर्व गोष्टी भोजनाच्या संदर्थात का सांगितल्या असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येणे हे स्वाभाविक आहे. त्याचे उत्तरही पुढे चरकाचार्यानी दिलेले आहे.
उष्ण म्हणजे गरम अन्न सेवन केल्यास त्याची रुची (चव) व्यवस्थित कळते. आपली पचनशक्ती चांगली राहते, ते भोजन व्यवस्थित पचते. म्हणून अन्न हे गरम, ताजे असावे, थंड झालेले, शिले अन्न खाल्ल्याने ते नीट पचत नाही.
अन्न स्निग्ध असले म्हणजेही पचनशक्ती नीट राहाते. अन्न नीट प्रकारे पोटामध्ये घुसळले जाऊन त्याचे पचन व्यवस्थित होते. पचनसंस्थेमध्ये विकृत वायूची उत्पत्ती होत नाही. स्निग्ध आहारामुळे शरीराची वाढ चांगली होते. इंद्रिये दृढ होतात. बळ वाढते आणि शरीराचा वर्ण प्रसन्न राहतो. म्हणून स्निग्ध अन्नाचे सेवन करावे. कोरडे अन्न खाल्ल्याने याच्या विपरीत परिणाम होतात. ब्रेड, डाळीच्या पीठाचे पदार्थ (उदा. भजी वैगरे) या सारख्या पदार्थांनी पचनसंस्था विकृत होते, म्हणून असे कोरडे अन्न खूप खाऊ नये. आहारामध्ये संतुलन असावे.

योग्य मात्रेत अन्न घेतल्याने आयुष्य वाढते. वात, पित्त, कफ हे दोष कुपीत होत नाहीत आणि शरीर निरोगी राहते.
पहिला आहार पाचाल्यानान्त्र दुसरे अन्न घेतल्याने अजीर्नासारखे विकार होत नाहीत. तसेच वात, पित्त, कफ या दोषांचा प्रकोप होत नाही. शरीरातील सर्व धातूंची पुष्टी चांगल्या प्रकारे होते.
याच प्रमाणे इष्ट प्रदेशातच अन्न सेवन करण्यास सांगितले आहे. याचा अर्थ अन्न सेवनाचे ठिकाण हे स्वछ असावे. तेथे कोणत्याही प्रकारची घाण असू नये. हे सर्व सांगण्याची वेळ आलेली आहे, म्हणूनच येथे मुद्दाम जोर देऊन मांडलेले आहे. कारण अनेक रोग या आहाराच्या वाईट सवयीमुळे होतात, असे लक्षात येते. टाळता येण्यासारख्या सवयी जाणीवपूर्वक टाळाव्यात.
मन प्रसान्न ठेवूनच अन्न सेवन करावे. असा एक आणखी मुद्दा वर सांगितलेला आहे. याचे कारण अन्न सेवनाच्या वेळेस मन प्रसन्न असल्यास ते व्यवस्थीत पचते आणि शरीराचे नीट पोषण करते. (ज्याला व्यवहारात अन्न अंगी लागणे असे म्हटले जाते.) अनेकांना जेवताना चीडचीड करीत जेवण्याची सवय असते. ही सवय चीडचीड करणाऱ्याला तर त्रासदायक ठरतेच, परुं इतरांनाही त्याचा त्रास होतो. म्हणून ते टाळावे.
फार भरभर, घाईत जेव्ल्यासही अन्न नीट पचत नाही. खूप हळूहळू जेवले तरीही अन्न नीट पचत नाही. म्हणून योग्य त्या वेगाने जेवावे. (खूप हळूहळू जेवल्याने शरीराची तृप्ती होत नाही. पोट भरले आहे असे वाटत नाही.)
सुमारे दोन हजार वर्षापूर्वी आयुर्वेदियांनी आरोग्य स्वस्थ राखण्यासाठी आहाराच्या संबंधी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या सर्व गोष्ट आजही तंतोतंत लागू पडतात. त्यातील एकही गोष्ट कालबाह्य झालेली नाही. रोग निर्माण होऊ नयेत म्हणून स्वस्थ मनुष्याने कोणत्या गोष्टी पाळाव्यात याचे सुंदर मार्गदर्शन आयुर्वेदाने केलेले आहे. आजच्या काळामध्ये आपली जीवनशैलीच बदलून गेली आहे. आहाराच्या सेवनाचे वर सांगितलेले नियम न पाळण्याची प्रवृत्ती त्यामध्ये वाढीला लागलेली दिसते आहे. त्याचाच परिणाम म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेले किवा शिळे झालेले अन्न खाण्याचे बरेच प्रमाण आहे. शरीरात चरबी वाढेल या वृथा भीतीपोटी योग्य तेवढे स्निग्ध पदार्थही खाल्ले जात नाही. शरीराला अत्यंत उपयोगी असणारे गाईचे तूप देखील अनेक जन खात नाहीत जेवण्याच्या वेळी एकाग्र आणि प्रसन्नचित्ताने जेवनेही कमी झालेले आहे. दूरदर्शन च्या समोर बसून जेवण्याची प्रवृत्ती वाढिला लागलेली आहे. नोकरीच्या निमित्ताने कार्यालायात डबा खाण्याची अनेकांवर वेळ आल्याने कोरडे अन्न खाण्याचीही सवय वाढते आहे. या सर्व गोष्टी आपले आरोग्य बिघडवणारे आहेत. हे लक्षात घेतले पाहिजे. या लेखात वर सांगितलेल्या आहार सेवन विधीला सोडून अनेक गोष्टी सध्या घडताना दिसत आहेत. असे असल्याने आदर्श आहर सेवन विधी समाजात पुन्हा प्रस्थापित करणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे सर्वानीच हा आहार सेवन विधी समजून घ्यायला हवा. आयुर्वेदाने सांगितलेला हा आदर्श आहार सेवन विधी आजही उपयुक्त असल्याने त्याचे पालन करणे हेच आपल्या एकूण आरोग्याच्या दृष्टीने हिताचे ठरेल असा विश्वास वाटतो.