बुद्धीवर्धनासाठी उपाय

|

बुद्धीवर्धनासाठी उपाय

                         लेखक :- वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक)

                मो. ९८२२०७५०२१

आपल्या पाल्यांना वैद्यकीय सल्ल्याशिवाय विविध प्रकारची स्मृतीवर्धक, बुद्धीवर्धक औषधे (ज्यांना ब्रेन तोनिक्स म्हणतात) काही पालक देत असतात. केवळ अशा प्रकारची औषधे देण्याने मुलांची स्मृती, बुद्धी वाढते का? की त्यासाठी आणखीन काही उपाययोजनांची आवश्यक्यता असते? असे काही प्रश्न अनेकांनच्या मनात घोळत असतात. प्रस्तुत लेखामध्ये या प्रश्नाच्या उत्तरांनबरोबर बुद्धी, स्मृती या संकल्पांचा आयुर्वेद शास्त्राने केलेला विचारही आपणापुढे ठेवला आहे.

आयुर्वेदाने बुद्धीमत्तेच्या सर्वांगीण विचार केलेला आहे. धी, धृती आणि स्मृती अशा तीन प्रकरणी त्याचे वर्णन आयुर्वेदात केलेले आहे.

धी म्हणजे बुद्धी यामध्ये ग्रहणशक्ती चा समावेश होतो. (ज्यास इंग्रजीत grasping powe असे म्हणतात.)

मनाची स्थिरता टिकवणारी शक्ती म्हणजे धृती होय. स्मृती म्हणजे स्मरणशक्ती पूर्वी पाहिलेल्या, वाचलेल्या, अनुभवलेल्या गोष्टींचे स्मरण चांगल्या तर्हेने होणे हे स्मृती चांगली असल्याचे लक्षण होय.

पाल्याला जाणून घ्या :

ही पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतर आपल्या मुलांमध्ये ग्रहणशक्ती अधिक आहे की स्मरणशक्ती अधिक आहे यासंबंधी विचार प्रत्येक पालकाने करायला हवा या नैसर्गिक शक्ती आहेत. काही मुलांची ग्रहणशक्ती मुळातच चांगली असते. तर काहींची स्मरणशक्ती चांगली असते. या दोन्ही शक्ती चांगल्या असणारीही अनेक मुले-मुली असतात. आपल्या पाल्यामध्ये कोणत्या प्रकारची शक्ती निसर्गतःच जास्त आहे, याचा विचार करून ती शक्ती अधिक वाढवण्यासाठी प्रयन्त करायला हवेत. त्याचप्रमाणे निसर्गतःच जी शक्ती कमी आहे, ती अजून कमी होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. अर्थात यासाठी वैद्यकीय मार्गदर्शन घेणे आवश्यक होय.

विविध औषधे :

आयुर्वेदाने अनेक वनस्पतींचा तसेच इतर औषधी द्रव्यांचा बुद्धिमत्तेला हितकारक असा उल्लेख केलेला आहे. ब्राम्ही, शंखपुष्पी, वेखंड, जटामांसी या वनस्पती तसेच सुवर्ण, रौप्य ही द्रव्ये बुद्धीला हितकारक आहेत असे सांगितले आहे. लहान मुलांना वेखंडाच्या कानडीत सोन्याचा अंश घालून ते मधात उगाळून देणे हे त्यांच्या बुद्धीच्या दुर्ष्टीने आरोग्यदायी असते असे आयुर्वेद शास्त्र सांगते.

चरकसंहिता या आयुर्वेदीय ग्रंथामध्ये लोहारसायन नावाचे औषध बुद्धिवर्धक असे सांगितले आहे. चरकसंहितेमध्येच :

१) मंडूकपर्णी वनस्पतीचा रस सेवन करणे.

२) जेष्ठमधाचे चूर्ण गाईच्या दुधामधून सेवन करणे.

३) गुळवेल वनस्पतीचा रस काढून त्याचे सेवन करणे.

४) शंखपुष्पी वनस्पतीचा कल्क (चटणी सारखे बारीक करून) सेवन करणे.

ही चार प्रकारची औषधे मेध्य रसायन म्हणजेच बुद्धीला हितकारक असल्याचे सांगितले आहे.

वरील सर्व औषधे अत्यंत उपयुक्त अशी आहेत परंतू त्यांचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावा.

गाईचे दूध तसेच त्यापासून बनविलेले तूप ही दोन्ही द्रव्ये आपल्या बुद्धीला हितकारक आहेत.

बुद्धीला हितकारक असणाऱ्या द्रव्यांची माहिती आपण आतापर्यत पाहिली मुलांच्या बुद्धीवर काही विशिष्ट गोष्टींचा प्रतिकूल परिणाम होत असतो. त्याचा परामर्श यानंतर घेणे उचित ठरेल.

अभ्यासाची सक्ती नको :

मुलांचा अभ्यास म्हणजे काही पालकांपुढे एक डोकेदुखी असते. मुलाना सक्तीने अभ्यास करायला लावणे तितकेसे चांगले नाही. योग्य तर्हेने आणि योग्य दिशेने त्यांना अभ्यास करण्यास प्रवृत्त करणे हे या बाबतीत आवश्यक असते.

काही मुलाना जागरण करून अभ्यास करण्यची सवय असते. जागरण करून अभ्यास करण्याची सवय चांगली नाही. आपल्या बुद्धीच्या, आरोग्याच्या दृष्टीने ते हितावह नाही. ज्यांना पहाटे उठून अभ्यास करणे शक्य आहे. अशांनी पहाटे उठून अभ्यास करावा. (अर्थात योग्य तेवढी झोप घेऊन) आपल्या पाल्याला मातृभाषेतून शिक्षण देण्याचा अधिकतर प्रयत्न करावा, म्हणजे त्याच्या बुद्धीवर उगाच ताण पडत नाही. बुद्धिमान विद्यार्थी मातृभाषेतून शिकल्यास चांगल्या रीतीने चमकु शकतो.

अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी अभ्यास योग्य दिशेने करावा.