शरद ऋतूतील रक्तदान

    Date : 28-Oct-2023
|

शरद ऋतूतील रक्तदान

रक्तदान आणि आयुर्वेद यांचा काय नेमका परस्पर संबंध असू शकेल याचा विचार केल्यास असे लक्षात येते की, आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये जरी रक्तदानाचा प्रत्यक्ष उल्लेख आढळत नसला तरीही ‘रक्त’ विषयक व्याधींच्या प्रतिबंधासाठी म्हणूनच रक्तदानाचे सहाय्य स्वस्थ निरोगी व्यक्तींना नक्कीच होऊ शकेल, या विचाराला पुष्टी देणारे विविध संदर्भ आयुर्वेदात आहेत.

आयुर्वेदीय विचार

शरीर हे तीन दोष, सात धातू आणि तीन मल यांनी बनलेले आहे. सात धातूपैकी रक्त हा दुसऱ्या क्रमांकाचा धातू आहे. देहाचे धारण करतात म्हणून या सातही घटकांना ‘धातू’ संज्ञा आहे. या प्रत्येक धातूचे विशिष्ट कार्यही ‘अष्टांग हृदय’ या आयुर्वेदीय ग्रंथात वर्णिलेले आहे.

‘जीवन’ देणे रक्तधातूचे कार्य आहे. यावरून हे स्पष्ट होते की, रक्तधातूला आपल्या शरीराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. हे आयुर्वेदानेही सांगितले आहे.

दोष, धातू, मल देहव्यापार चालवतात, वात, पित्त, कफ हे तीन दोष धातूंच्या आश्रयाला असतात. त्यामध्ये ‘पित्त’ हा दोष धातूंच्या आश्रयाला राहून आपले कार्य करतो.

पित्तदोषाची कार्य

शरीरातील उष्णता, दृष्टी, पचनकार्य, भूक, तृष्णा, रुची, प्रतिभाशक्ती, मेधा, धी (बुद्धी), शैार्य, शरीराचे मार्दन या सर्व गोष्टी प्राकृत पित्तदोषाच्या आहेत. हा पित्तदोष प्रकृपित झाला तर वरील क्रियांमध्ये कुठेना कुठे विकृत निर्माण होते. हे पित्त वर्षातील सहा ऋतूंपैकी ‘शरद ऋतू’ मध्ये निसर्गत:च प्रकुपित होते. त्यामुळे काही जणांना पित्तामुळे होणाऱ्या व्याधी निर्माण होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ तोंड येणे, हातापायांची जळजळ होणे, अंगावर शितपित्त येणे, अतिशय तहान लागणे, पचनात विकृत होणे इत्यादी.

पित्तदोषाचे कार्य सुरळीत चालावे यासाठी हा दोष प्रकुपित होऊ न देणे महत्त्वाचे असते. हा दोष रक्तधातूच्या आश्रयाला असतो आणि शरद ऋतुमध्ये तो निसर्गत: प्रकुपित होतो. ऋतुचर्या सांगताना आयुर्वेदाने विरेचन आणि स्तुती असे दोन प्रमुख प्रतिबंधात्मक उपाय सांगितले आहेत. त्यामुळे शरद ऋतुमध्ये स्वस्थ, निरोगी व्यक्तींनी ‘रक्तदान करावे’ अशी चळवळ उभारल्यास ते शास्त्रीयदृष्ट्या योग्य ठरेल, असे वाटते. याने दोन गोष्टी साधतील एक म्हणजे ऋतुचर्या पाळली गेल्याने रक्त देणाऱ्या व्यक्तीचे स्वास्थ्य टिकेल आणि रक्त ज्याला आवश्यक आहे त्याला ते उपयुक्त ठरेल. अर्थात हे सर्व करीत असताना रक्तदानाचे सर्व नियम पाळून मगच शरद ऋतूत स्वस्थ्य व्यक्तींनी रक्तदान करावे. शरद ऋतू साधारणपणे १५ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर असे दोन महिने असतो. ज्याला ऑक्टोबर हिट असेही म्हटले जाते. म्हणजे या काळात पित्तदोषामुळे होणाऱ्या विविध शरीरव्याधींच्या प्रतिबंधासाठी रक्तदान उपयुक्त ठरते.

रक्तदुष्टीजन्य रोग

आयुर्वेदानुसार रक्त धातूची दुष्टी झाली तर अनेक व्याधींची निर्मिती होते. ‘विधीशोणितीय’ अध्याय’ नामक अध्यायात चरकसंहितकारांनी अध्यायात याचे स्पष्ट सविस्तर वर्णन पाच श्लोकात केलेले आहे.

या पाच श्लोकांमध्ये चरकसंहितकारांनी अनेक रक्तदुष्टीजन्य रोगांचा नामनिर्देश केलेला आहे. त्यामध्ये मुखपाक (तोंड येणे), डोळे लाल होणे, मुखदुर्गंधी, गुल्म (गोळा येणे), विसर्प (नागीण), रक्तपित्त, गुळ होणे, लघवीतून रक्त पडणे, रक्तप्रदर, वातरक्त (सांधेदुखीचा एक प्रकार), वैवण्य, अग्नी मंद होणे, खूप तहान लागणे, अंग जड होणे,

अंगाची आग होणे, अरुची (तोंडाला चव नसणे), डोके दुखणे, खूप राग येणे, तोंड खारट होणे, अधिक घाम येणे, शरीराला दुर्गंधी येणे, मद, कम्प, अतिनिद्रा येणे हे रक्तदुष्टीमुळे होतात.

हे रोग झाल्यास ‘रक्त मोक्षण’ हा एक उपाय आयुर्वेदाने सांगितला आहे. परंतु हे विकार होऊ नयेत म्हणून स्वस्थ व्यक्तींने नियमित ‘रक्तदान’ करत राहिल्यास या विकारांना प्रतिबंध होऊ शकेल. योग्य ‘रक्तदान’ हे अनेक रोगांना प्रतिबंध म्हणून अतिशय उपयुक्त ठरू शकते.