भारतीय ऋतुचक्रमधील उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळा या ऋतूपैकी हिवाळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय अनुकूल असणारा आहे. आयुर्वेद शास्त्राने हा ऋतू आरोग्य आणि बलवर्धनासाठी उपयुक्त सांगितला आहे. आपल्याकडे साधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी असा चार महिने हिवाळा असतो. हिवाळा हिवाळा सुरु झाला कि आपली भूक

11 Nov 2023 11:07:29

हिवाळ्यातील आरोग्य

लेखक- वैद्य. विजय कुलकर्णी, नाशिक.

मो. ९८२२०७५०२१

भारतीय ऋतुचक्रमधील उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळा या ऋतूपैकी हिवाळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय अनुकूल असणारा आहे. आयुर्वेद शास्त्राने हा ऋतू आरोग्य आणि बलवर्धनासाठी उपयुक्त सांगितला आहे. आपल्याकडे साधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी असा चार महिने हिवाळा असतो. हिवाळा हिवाळा सुरु झाला कि आपली भूक वाढते, हा आपल्या प्रत्येकचा अनुभव आहे. हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. हिवाळ्यातील थंडीने त्वचेतीव राध्रे संकुचित झाल्याने शरीरातील उष्मा वाढतो. आपल्या भूकेशी आणि अन्नपचनाशी संबंधित असणारा ‘जठराग्नी’ हिवाळ्यात वाढतो. त्यामुळे आपल्याला भूक जास्त लागते आणि पचनशक्तीही वाढते, असा आयुर्वेदचा सिद्धांत आहे. म्हणून हिवाळ्यामध्ये आपल्या आहारामध्ये मधुर, आंबट व काहीसे खारट पदार्थ असले तर ते शरीराला हितावह ठरते. त्यामानाने तिखट, कडू आणि तुरट चवीचे पदार्थ खानुअमध्ये कमी असावेत. हिवाळ्यात भुकेची उपेक्षा शक्यतो करू नये.

पौष्टिक पदार्थ हवेतच

पौष्टिक पदार्थाची रेलचेल आपल्या अन्नामध्ये नेहेमी असावी. हिवाळ्यातील प्रबळ पचनशक्तीमुळे हे पौष्टिक पदार्थ पचनसंस्थेमध्ये विकृती निर्माण न करता देहाची पुष्टी करतात. दुधाचे, खव्याचे बनवलेले पदार्थ, गुळाची पोळी यासारखे पुष्टीदायक अन्नपदार्थ खाण्यात असावेत. भोजनामध्ये साजूक तुपाचाही वापर नेहमी करावा. कारण हे साजूक तूप शरीरामधील उत्साह वाढवते. स्मृती, कांती वाढवते भूक वाढवते. शरीराची पुष्टी करते.

याचबरोबर आपल्या खाण्यामध्ये गहू, बाजरी, त्याचप्रमाणे मोड आलेल्या कडधान्यापासून तयार केलेले अन्नपदार्थ खावेत. रताळी कांदे, भुईकोहळे तसेच पडवळ, दोडका इ. भाज्यांचाही मुबलक वापर आपल्या खाण्यात करावा. हे सर्व पदार्थ शक्यतो गरमागरम व ताजे असताना सेवन करावेत. मांसाहार थोडा अधिक प्रमाणात करा. शाकाहारी लोकांनी मात्र वर सांगितल्याप्रमाणे पौष्टिक पदार्थ अन्नामध्ये नेहेमी असू द्यावेत.

मुगाची खिचडी आणि शिरा

हिवाळ्यात सकाळी खाल्लेली मुगाची गरमागरम खिचडी आणि मधल्या वेळेतील शिरा शरीराला खूप आरोग्यदायी ठरतो. भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्व असणारे दिवाळी व मकर संक्रांत हे दोन सन हिवाळ्यातच येतात. हिवाळ्यात असलेला प्रबळ पचनशक्तीमुळे दिवाळीत विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ सेवन करण्याची प्रथा पडली असावी. मकर संक्रांतीत गुळाची पोळी खाण्याचा प्रघात त्यामुळेच असावा. या ऋतुमध्ये आपल्या खाण्यामध्ये सफरचंद, केळी, काजू, बदाम, खजूर, डाळिंब, जर्दाळू यासारखी पौष्टिक फळे असावीत. या सर्व खाद्यपदार्थच्या सेवनाने शरीरामध्ये मुबलक उर्जा निर्माण होते. अर्थात त्याचे अतिसेवन करणे केव्हाही वाईटच.

मद्यपान, चहा नको

अनेक लोक हिवाळ्यामध्ये शरीरात उष्णता निर्माण होण्यासाठी मद्यपान करतात. काहीजण चहाचे सेवन या काळात अधिक प्रमाणात करतात. या दोन्हीमुळे शरीरात तात्कालिक उष्णता निर्माण होत असली तरीही मद्यपान करणे हि आरोग्याला घातक गोष्ट आहे. त्याने यकृतावर विपरीत परिणाम होतो. मद्यपानाची हौस असलेल्यांनी द्राक्षारिष्टसारखे आयुर्वेदीय पद्धतीने बनलेले मद्य मर्यादित प्रमाणात घ्यावे. चहाचे अतिसेवन केल्यास आमाशयाचे अल्सरसारखे रोग निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून चहा जास्त प्रमाणात घेण्याचे टाळावे.

मधुमेहाने पिडीत असणाऱ्यांनी मधुर पदार्थाचे सेवन करणे या ऋतूतही टाळावे. त्याचप्रमाणे जुनाट सर्दीने पिडीत झालेले, अतिशय मेदस्वी असलेल्यांनीही मधुर पदार्थाचे सेवन कमी करावे.

स्नान आणि व्यायाम

स्नानासाठी, शौचासाठी आणि हात-पाय धुण्यासाठी गरम गरम पाण्याचा वापरही या ऋतूत सुखावह वाटतो. स्नान करण्यापूर्वी तेलाने सर्वाग मर्दन करावे. हे मर्दन केवळ दिवाळीच्या अभ्यंगस्नानाच्या दिवशी न करता रोज केले पाहिजे. याने शरीराची पुष्टी होते. त्वचेची कांती वाढते. तरुणांनी या काळात सूर्यनमस्कार जोर, बैठका असा व्यायाम करून शरीर कमवावे.

वर सांगितल्याप्रमाणे आहार-विहार या ऋतूत केल्यास आरोग्य व बलवर्धन यांच्या दृष्टीने ते निश्चितच हितावह ठरेल.

Powered By Sangraha 9.0