थायरॉईड आणि आयुर्वेदः वेळीच काळजी घ्या, आरोग्य जपा

17 Jan 2026 12:49:13

thyroid
 
डॉ. लीना बोरुडे
आयुर्वेदाचार्य, पुणे
 
आजकाल अनेक लोक थायरॉईडच्या त्रासाने त्रस्त आहेत. थायरॉईड ही मानाच्या पुढील बाजूस असलेली फुलपाखराच्या आकाराची एक लहान पण खूप महत्त्वाची ग्रंथी आहे. ती आपल्या शरीरातील ऊर्जा, वजन, पचन, हृदयाची गती, केस, त्वचा आणि मनःस्थिती यावर नियंत्रण ठेवते. थायरॉईड ग्रंथीमधून तयार होणारे हार्मोन्स कमी किंवा जास्त झाले, तर शरीराचा समतोल बिघडतो.
 
थायरॉईडचे दोन मुख्य प्रकार
 
१) हायपोथायरॉईड (थायरॉईड कमी काम करते)
यामध्ये शरीराची गती मंदावते. 
लक्षणेः सतत थकवा, वजन वाढणे थंडी जास्त वाजणे, सूज येणे, केस गळणे, बद्धकोष्ठता, उदासीनता/नैराश्य
 
२) हायपरथायरॉईड (थायरॉईड जास्त काम करते) यामध्ये शरीराची गती खूप वाढते.
लक्षणेः बेचैनी वजन झपाट्याने कमी होणे, हृदयाची धडधड, घाम जास्त येणे, चिडचिड, झोप न लागणे इ.
 
आयुर्वेद काय सांगतो ?
आयुर्वेदानुसार थायरॉईडचा संबंध पचनशक्ती (अग्नि) आणि वात-पित्त-कफ या दोषांच्या असंतुलनाशी आहे. पचन नीट नसेल, ताणतणाव जास्त असेल आणि जीवनशैली विस्कळीत असेल तर थायरॉईडचा त्रास वाढू शकतो.
आहारात काय करावे ?
 
हायपोथायरॉईडमध्ये गरम, हलका आणि पचायला सोपा आहार घ्यावा मूगडाळ, भाजी, तूप, आले, दालचिनी उपयोगी थंड पदार्थ, मैदा, साखर, जास्त तळलेले पदार्थ टाळावेत हायपरथायरॉईडमध्ये थंड, शांत करणारा आहार घ्यावा
नारळपाणी, दूध, आवळा, तूप फायदेशीर तिखट, खारट पदार्थ, चहा-कॉफी कमी करावेत आयुर्वेदिक औषधे आयुर्वेदात काही औषधी वनस्पती थायरॉईडसाठी उपयुक्त मानल्या जातात, पण औषधे स्वतःहून घेऊ नयेत. नेहमी तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानेच उपचार करावेत. गुळवेल, आमलकी, कांचनार गुग्गुळ, अश्वगंधा, ब्राह्मी इ. औषधी तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
 
योग आणि प्राणायाम -नैसर्गिक उपाय
नियमित योग केल्याने थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारते.
उपयुक्त योगासनः सिंहासन, सर्वांगासन, हलासन, मत्स्यासन, भुजंगासन, धनुरासन, सेतुबंधासन
प्राणायामः नाडीशोधन, उज्जयी, कपालभाती इ. ताणतणाव कमी करा सततचा ताण थायरॉईड बिघडवू शकतो.
म्हणूनः रोज थोडा वेळ ध्यान करा. पुरेशी झोप घ्या. मोबाईल व स्क्रीनचा वापर कमी करा. निसर्गात चालण्याची सवय लावा.
 
वेळीच ओळख महत्त्वाची
 
वजन वाढणे, थकवा, केस गळणे, मासिक पाळीतील बदल, चिडचिड अशी लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका. वेळीच तपासणी व योग्य उपचार घेतल्यास मोठे आजार टाळता येतात. थायरॉईड हा आजार नियंत्रणात ठेवता येतो. आधुनिक वैद्यक तपासणी व औषधे देते, तर आयुर्वेद आहार, जीवनशैली, योग आणि मानसिक शांततेवर भर देतो. योग्य औषधोपचार आयुर्वेदिक दिनचर्या = निरोगी जीवन थोडी जागरूकता आणि नियमित काळजी घेतली तर थायरॉईड असूनही आपण निरोगी आयुष्य जगू शकतो.
Mo. 9511805298
 
 
 
Powered By Sangraha 9.0